मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका हवालदाराला कोरोना विषाणुची लागण झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित कॉन्स्टेबल कल्याण (पश्चिम) येथील रहिवासी आहे. दरम्यान, १५ मार्चपासून ते २७ मार्चपर्यंत या पोलीस कॉन्स्टेबलच्या संपर्कात आलेल्या २५ पोलिसांची देखील तपासणी करण्यात आली आहे. २५ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ३० मार्च रोजी पोलीस कॉन्स्टेबलला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचा खोकलाही वाढला होता. त्यामुळे त्याला कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. येथे उपचार घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्यासोबत १५ ते २२ मार्च काळात सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि २४ ते २७ मार्च काळात लॉकअप गार्ड येथे संपर्कात आलेल्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईत रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण