अंबरनाथला शिधावाटप दुकानांमधून धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध

अंबरनाथ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिधावाटप दुकानांमधून ग्राहकांना देण्यात येणारा स्वस्त धान्यसाठा उपलब्ध झाला आहे, सध्या तरी एप्रिल महिन्यासाठी धान्यपुरवठा करण्यात येणार आहे. ___ अंबरनाथमध्ये सुमारे ३५ हजार शिधावाटप ग्राहक असून त्यांची ऑनलाईन जोडणी करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार ५८ हजार रुपयांच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना गहू दोन रुपयांप्रमाणे तीन किलो तर तीन रुपये किलो याप्रमाणे दोन किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे, शहरात आजमितीला ६९ शिधावाटप दुकानांतून ग्राहकांना धान्य देण्यात येते. एप्रिल महिन्याचा ७० टक्के धान्यसाठा आला असून उर्वरित ३० टक्के धान्यसाठा येत्या काही दिवसात उपलब्ध होईल अशी माहिती शिधावाटप नियंत्रक अधिकारी पी. एस . राठोड यांनी दिली. शिधावाटप दुकानांमधून स्वस्तात धान्य मिळणार म्हणून ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता आहे, होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक ग्राहकांना टोकन देऊन त्यानुसार धान्य वाटप करण्याच्या सूचना संबंधित दुकानदारांना देण्यात आल्या आहेत, कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पथक दुकानदारांवर लक्ष ठेवणार असल्याचेही श्री. राठोड यांनी सांगितले. शासनाच्या निर्णयानुसार उर्वरित दोन महिन्यांचे धान्य ग्राहकांना वितरित केले जाणार आहे. दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीमध्ये गरीब नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा पडू नये, शिधावाटप दुकानांतील धान्यसाठ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आढावा बैठक बोलावली होती. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, रेशन कृती समिती अध्यक्ष राजश कौठाळे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक तुळशीराम चौधरी, मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आदी उपस्थित होते.